ठाणे,दि.7: न्यायालयाच्या आवारातच महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधमांनी महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला आहे. ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या (फॅमिली कोर्ट) आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका महिलेवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे. आरोपींनी महिलेला केकमधून गुंगीचे औषध देऊन हे घृणास्पद कृत्य केल्याचं तक्रारीत नमूद केलं आहे.
हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर नराधमांनी महिलेला ब्लॅकमेल करत अत्याचार केला. बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला ब्लॅकमेल केले जात होते. ‘बर्थडे’ सेलिब्रेशनच्या बहाण्याने एका विवाहित महिलेला कारमध्ये बोलावून, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 25 ऑगस्ट 2025 रोजी घडलेल्या या संतापजनक प्रकाराचा उलगडा तब्बल तीन महिन्यांनी झाला असून, पीडितेने हिंमत एकवटून तक्रार दाखल केल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
रात्री 11 वाजता पीडितेला रस्त्यावर सोडून देताना, “वाच्यता केलीस तर व्हिडिओ व्हायरल करू,” अशी धमकी आरोपींनी दिली. बदनामीच्या भीतीने पीडितेने तीन महिने हे दुःख मनात दाबून ठेवले. मात्र, आरोपींनी या व्हिडिओचा आधार घेत तिला सातत्याने ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. अखेर हा त्रास सहन न झाल्याने पीडितेने 5 डिसेंबर 2025 रोजी एका वकिलाच्या आणि मैत्रिणीच्या मदतीने ठाणे नगर पोलिस ठाणे गाठले आणि आपबीती सांगितली.
काय आहे प्रकरण?
पीडित महिलेने सोशल मीडियावर कामासंदर्भातील एक जाहिरात पाहिली होती. एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने तिने त्या नंबरवर संपर्क साधला. आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिचा विश्वास संपादन करत तिला ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये नोकरी मिळवून दिली. 25 ऑगस्टला रात्री 8.30 च्या सुमारास आरोपींपैकी एकाने स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा आहे असे सांगून त्याने पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये बोलावले.
केक कापताना त्यांनी त्यामध्ये आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. हा केक खाल्ल्यानंतर पीडित महिलेची शुद्ध हरपली. याच संधीचा फायदा घेत गाडीतील दोन्ही आरोपी हिरालाल केदार आणि रवी पवार यांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले.








