दक्षिण आफ्रिकेतून महाराष्ट्रात आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

0

डोंबिवली,दि.२९: दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) महाराष्ट्रात (Maharashtra) आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहारातून गेल्या बुधवारी डोंबिवलीत आली आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्याला कल्याणमधील पालिकेच्या लालचौकी आर्ट गॅलरी येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. तसेच या व्यक्तीला ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग तर झाला नाही ना?, यासंदर्भातील चाचण्याही केल्या जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेय. दरम्यान ही व्यक्ती नवी दिल्ली मार्गे दक्षिण आफ्रिकेवरुन मुंबईत आल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रवासादरम्यान नक्की काय घडलं याचा तपशीलही समोर आलाय.

केपटाऊन-दुबई-दिल्ली आणि मुंबई असा प्रवास करत हा रहिवासी डोंबिवलीत आला. प्रवासात या प्रवाशाला ताप आल्याचे जाणवले. त्याने दिल्लीत विमानतळावर उतरल्यावर कोरोना चाचणी करुन घेतली. ती पॉझिटिव्ह आली. त्याने घरी संपर्क करुन घरात कोणीही थांबू नका. मी एकटाच घरात राहणार असल्याचे कुटुंबियांना कळविले. बुधवारी हा प्रवासी डोंबिवलीत आला.

जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट

डोंबिवलीमध्ये परतल्यानंतर या वय्क्तीने पुन्हा पालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रात चाचणी केली. ती सकारात्मक आली. हा प्रवासी द. आफ्रिकेतून आला असल्याने तातडीने पालिकेच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या घर परिसराचे निर्जंतुकीकरण केले. या रहिवाशाची पालिकेच्या कल्याणमधील संस्थात्मक विलगीकरणात रवानगी केली. हा रुग्ण स्थिर आहे. या रुग्णाची जनुकीय गुणसूत्र चाचणी म्हणजेच जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्याचे नियोजन केले आहे.

सात दिवस पूर्ण झाले…

आफ्रिकेतून येऊन या रुग्णाला सात दिवस पूर्ण होत आले आहेत. त्यानंतर ही त्यांची जनुकीय गुणसूत्र चाचणी, कोरोना चाचणी केली जाईल, असे साथ रोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

नातेवाईकांचीही चाचणी करण्यात आली

या रुग्णाला पालिकेच्या पूर्ण नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णाच्या नातेवाईकाची पण कोरोना चाचणी केली. ती नकारात्मक आली आहे. आफ्रिकेसह कोरोना रुग्णांची संख्या अधिक असलेल्या परदेशातून शहरात येणाऱ्या प्रवाशांवर शासन नियमानुसार लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे, असे डाॅ. पानपाटील यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here