मुंबई,दि.११: कर्जमाफीवरून केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माफी मागितली आहे. बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एक वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, लोकांना कर्जमाफीची सवय लागली आहे आणि आम्हाला निवडून यायचे असल्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासने देतो. लोकांनी ठरवायला हवं की त्यांनी काय मागायचं आहे.
जळगाव येथील कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्यानंतर टीकेचे धनी ठरलेल्या सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी खुलासा केला आहे. शुक्रवारी दुपारी अहमदपूर येथे बोलताना आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असे म्हणत त्यांनी उद्भवलेल्या वादावर पडदा टाकला आहे.
जळगाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज्यभरातून सहकारमंत्री पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. एखाद्या गावात निवडणुकीच्या काळात नेता गेला आणि लोकांनी सांगितले की, आम्हाला गावात नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार! त्यामुळे काय मागावे हे तुम्ही ठरवायला हवे. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही आश्वासने देतो. सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे, असे वादग्रस्त विधान सहकारमंत्री पाटील यांनी केले होते.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील विधानाचा खुलासा केला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी शेतकर्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावे, यासाठी बँकांनी शेतकर्यांना कर्ज द्यावे, असे आपण म्हणालो होतो. ही योजना कर्जमाफीमध्ये बसत नाही, हे म्हणण्याचा आपला उद्देश होता. तरीही आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, अशा शब्दात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या आहेत.








