दि.26: जगातील काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार (A new strain of the corona virus) समोर आला आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. (The health ministry has directed all states and union territories to remain vigilant) परदेशात कोरोनाचा नवीन प्रकार B.1.1529 आढळल्यानंतर मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळल्यानंतर जगात खळबळ उडालीय. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अतिशय धोकादायक असल्याचं समोर येतंय. या पार्श्वभूमीवर ब्रिटनकडून सहा आफ्रिकी देशांसाठी उड्डाणं तत्काळ रद्द करण्यात आली आहेत. अनिश्चित काळासाठी या उड्डाणांवर बंदी घालण्यात आलीय.
WHO नं बोलावली आपात्कालीन बैठक
याच पार्श्वभूमीवर, ‘जागतिक आरोग्य संघटने’नंही (WHO) शुक्रवारी एका आपात्कालीन बैठकीचं आयोजन केलंय. दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवाना मध्ये सापडलेला कोरोना हा नवा व्हेरियंट ‘मल्टिपल म्युटेशन’ तयार करत असल्याचं सांगण्यात आलंय.
‘युनायटेड किंगडम’ची आरोग्य तपासणी यंत्रणा UKHSA कडून कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनविषयी माहिती जाहीर करण्यात आलीय. कोरोनाचा नवा व्हेरियंट B.1.1.529 विषयी अधिक अभ्यास सुरू असल्याचं घोषित करण्यात आलंय. यूकेचे आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी, UKHSA कडून कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची तपासणी सुरू असल्याचं ट्विट केलंय. यासाठी आणखीन डेटाची आवश्यकता असल्याचं सांगतानाच याविषयी योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सहा आफ्रिकी देशांना ‘रेड लिस्ट’मध्ये जोडून इथून येणाऱ्या उड्डाणांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात येत असल्याचं ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तसंच ब्रिटनला दाखल होणाऱ्या प्रवाशांना क्वारंटीन होणं अनिवार्य करण्यात आलंय.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे जवळपास 100 हून अधिक संक्रमित रुग्ण आढळले आहेत. हा नवा व्हेरियंट ‘चिंताजनक’ (Variant of Concern) असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नव्या व्हेरियंटची माहिती समोर येताच दक्षिण आफ्रिकेतल्या सरकारनं खासगी लॅबसोबत मिळून मोठ्या प्रमाणात नागरिकांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘द नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज’ (NICD) च्या म्हणण्यानुसार हा करोना स्ट्रेन अधिक संक्रमक असू शकतो.