जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई, 24 सरपंच, 820 सदस्यांचे सदस्यत्व रद्द

0

बीड,दि.3: जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी 24 सरपंच आणि 820 जणांचे सदस्यत्व रद्द केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेऊन निवडून येणे हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो.

ग्रामपंचायत निवडणूक लढविताना अनेकांकडे जात प्रमाणपत्र नसते. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारास निवडून आल्यानंतर आपले जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी एक वर्षाची मुदत असते, परंतु अनेकजणांना आपली वंशावळ व इतर कागदपत्रे सादर करता येत नाही. परिणामी जात पडताळणी वैधता प्रमाणापत्र मिळत नाही. 

जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी 20 जानेवारी रोजी जिल्ह्यातल्या सात तालुक्यातील 13 सरपंच, तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा कारवाई करत चार तालुक्यातील 11 सरपंच आणि 402 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 24 सरपंच आणि 820 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here