संभल,दि.25: शुक्रवारी उत्तर प्रदेशच्या संभल येथील जामा मशिद परिसरात वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. प्रजासत्ताक दिनापूर्वी संभल येथील जामा मशिदीत देशभक्ती, एकता आणि सौहार्दाचे दृश्य पाहायला मिळाले. नमाज अदा केल्यानंतर मशिदीतून बाहेर पडलेल्या मुस्लिम बांधवांनी केवळ तिरंगा झेंडेच वाटले नाहीत तर त्यांनी एकाच आवाजात हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणाही दिल्या. यावेळी राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला. याशिवाय प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहनही करण्यात आले.
24 नोव्हेंबरला जामा मशीद सर्वेक्षणाच्या निषेधार्थ हिंसाचार झाला होता. ज्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. तेव्हापासून संभलमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शुक्रवारी नमाज अदा करून मुस्लीम बांधव जामा मशिदीतून बाहेर पडले तेव्हाचे दृश्य वेगळेच होते. मशिदीसमोर देशभक्तीचे चित्र दिसत होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित बांधवांनी हातात तिरंगा धरला होता. हातात तिरंगा फडकावत आणि हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देत नमाजी देशभक्तीच्या रंगात दिसले.
24 नोव्हेंबर 2024 रोजी संभलच्या जामा मशिदीत सर्वेक्षणादरम्यान परिसरात हिंसाचार झाला होता. त्यानंतर शुक्रवारच्या नमाजपूर्वीच्या बंदोबस्ताच्या दृष्टीने आजूबाजूच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.