धर्मराज काडादी यांचे सोलापूर दक्षिणबाबत मोठे विधान 

0

सोलापूर,दि.१०: धर्मराज काडादी (Dharmraj Kadadi) यांनी सोलापूर दक्षिणबाबत मोठे विधान केले आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या आहेत. शहरी भागातील अनेक नगरात नागरिक समस्यांनी त्रस्त आहेत. अशातच सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी मोठे विधान केले आहे. दहा वर्षांपूर्वी मतदारांनी ज्यांना मोठ्या आशेने निवडून दिले. त्यांनी मतदारसंघाचा विकास करण्याऐवजी द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे जनतेचे मूलभूत प्रश्नही सुटले नाहीत. सुडाचे राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधीला पराभूत करण्याची हीच योग्य वेळ असून मतदारांनी आपल्याला सेवेची संधी दिली तर या मतदारसंघातील शेतीच्या सिंचनाबरोबरच पिण्यासाठी पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि रोजगाराचा प्रश्न मार्गी लावून तरूणांना स्वावलंबी बनवू, अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी दिली.

शनिवारी, काडादी यांनी वडकबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, अकोले (मंद्रप), गुंजेगाव, कंदलगाव, अंत्रोळी आणि निंबर्गी या गावांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्यात ठिकठिकाणी काडादी यांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्या या दौऱ्यात स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती महादेव पाटील, भीमाशंकर जमादार, सिकंदरताज पाटील, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार कोळी, भारत जाधव (तिहे), सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक विद्यासागर मुलगे, शिवानंद पाटील कुडल, राजशेखर पाटील, अॅड. शिवशंकर बिराजदार, सुरेश झळकी, लक्ष्मण झळकी, प्रा. संतोष मेटकरी, शिवशरण दिंडोरे, अशोक देशमुख, बाबुराव बुरूंग आदी उपस्थित होते.

मतदारांशी झालेल्या संवादाच्यावेळी काडादी म्हणाले, या मतदारसंघातील मतदारांनी ज्यांना दहा वर्षे निवडून दिले. त्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विकासाचे राजकारण करण्याऐवजी सहकारी संस्था व सहकारी चळवळ उ‌द्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सहकारमंत्री असताना त्यांनी सहकारी संस्थांचे बळकटीकरण व सक्षमीकरणासाठी पदाचा सदुपयोग करण्याऐवजी त्यांनी सहकारी संस्था बंद पाडण्याचे धोरण अवलंबले. शेतकऱ्यांसाठी मंदिरासमान असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून राज्याच्या सहकार चळवळीत आदर्श असलेला हा साखर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याचा राग शेतकरी सभासद आणि समस्त मतदारांमध्ये आहे. शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केलेल्या भाजपच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पराभूत करून आपला राग दाखवून दिला. तोच संताप अजूनही कायम असून सिध्देश्वर कारखाना बंद पाडून स्वतःचा खासगी कारखाना चालावा म्हणून हा उद्योग करणाऱ्या भाजपच्या आमदाराला मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास काडादी यांनी व्यक्त केला.

काडादी यांच्यामुळे शेतकऱ्यांना न्याय

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे. या विश्वासाला धर्मराज काडादी यांनी तडा जाऊ दिला नाही. ते उसाला सर्वाधिक दर जाहीर करतात. त्यामुळे अन्य कारखानदारांनाही ‘सिध्देश्वर’ची बरोबरी करावी लागते. मात्र ते ‘सिध्देश्वर’ इतका दर देऊ शकत नाहीत. शेतकऱ्यांना न्याय देणारे धर्मराज काडादी यांचे सक्षम नेतृत्व आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘कॉम्प्युटर’ समोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून देऊ, असा निर्धार गुंजेगाव येथे प्रताप पाटील यांच्यासह समस्त गावकऱ्यांनी केला.

नद्यांवर बॅरेज बांधून सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार

वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधण्याची भाजपच्या आमदारांनी आतापर्यंत नुसती आश्वासने दिली. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. भीमा आणि सीना नद्यांवर बॅरेज बांधले असते तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला नसता. मतदारांनी आपल्याला सेवेची संधी दिली तर या दोन्ही नद्यांवर बॅरेज बांधून उन्हाळ्यात नदीपात्रात कायमस्वरूपी पाणी राहील यासाठी प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी गावभेट दौऱ्यात मतदारांना दिली. उजनीच्या हक्काचे पाणी कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळवून देऊ, असेही त्यांनी आश्वासित केले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here