बारामती,दि.2: राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी खळबळजनक आरोप केला आहे. राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शरद पवार दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीमध्ये बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार?
अशात पवार यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. अनेक गोष्टी हल्ली होतात. हे सरकारचं वैशिष्ट्ये आहेच. विमानने फॉर्म पोहोचवला. अनेक जिल्ह्यातून ऐकतोय, अधिकाऱ्यांकडून ऐकतोय, सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना अर्थ सहाय्य दिलं जातं त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते. त्या विभागातील अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळतं, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.त्यावरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मला महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीची चिंता वाटते. कारण काही महत्त्वाचे प्रश्न हाताळायला सध्याच्या राज्यकर्त्यांना अपयश आलं आहे. केंद्र सरकार अर्थखात्याशी संबंधित एका विभागाने आर्थिक कामगिरीच्या जोरावर देशातील राज्यांचे रँकिंग जाहीर केले आहे. जे राज्य एकेकाळी क्रमांक एकला होते, ते पहिल्या पाचमध्ये नाही. याशिवाय, उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नासंदर्भातही महाराष्ट्रासाठी धक्कादायक परिस्थिती आहे. हा पंतप्रधानांसोबत काम करणाऱ्या लोकांनी तयार केलेला अहवाल आहे. अर्थव्यवस्था मजबूत करायला जी काही पावल टाकली पाहिजेत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुसतं राजकारण करुन प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.
पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते. त्यावर मला अधिक बोलायची इच्छा होती. पण त्या अधिकाऱ्यांनी कमिटमेंट करून घेतली आमची नाव पुढे आणू नका. त्यामुळे त्यांचं भवितव्य संकटात जावू नये म्हणून मी अधिक बोलत नाही. पण ही नावे ऐकायला मिळतंय की पोलीस दलाची वाहनं आहेत त्यातून उमेदवारांना रसद पोहोचवली जात आहे. माझ्या हातात ऑथेटिंक माहिती असती तर मी वाटेल ते केलं असतं. पण माहितीशिवाय भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही, असंही शरद पवार म्हणालेत.