सोलापूर,दि.23: भाजपने विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने उमेदवारी सोमवारी (दि.21) यादी जाहीर केली होती. अजित पवार गटाकडून देखील 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आले होते. आता सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघाकरिता राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस कडून (अजित पवार) आमदार यशवंत माने यांच्या उमेदवारीवर मंगळवारी पक्षाने अधिकृत शिक्कामोर्तब केला असून पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते माने यांना मुंबईमध्ये पक्षाचा अधिकृत उमेदवारी एबी फॅार्म दिला आहे.
मागील पाच वर्षात तीन हजार 858 कोटी 13 लाख रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी आणून राज्यात सर्वाधिक निधी आणलेले आमदार, अशी राज्यभर ओळख असलेले आमदार माने दुस-यांदा निवडणूक रिंगणात असणार आहेत.

मागील पाच वर्षात माने यांनी 2 हजार 740 कोटी रुपये आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी 722 कोटी 19 लाख तसेच अनगरसह इतर गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी 395 कोटी 48 लाख रुपये असा तब्बल 3 हजार 858 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.
सातत्याने मतदारसंघात वावर, जनता दरबाराच्या माध्यमातून थेट मतदारांशी संपर्क या जमेच्या बाजू असून मागील आठवड्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावांचा गावभेट दौ-याच्या निमित्ताने प्रचाराची सुरुवात त्यांनी केली आहे.