Ratan Tata: महाराष्ट्रभूषण उद्योगपती रतन टाटा यांचे निधन 

0

मुंबई,दि.10: Ratan Tata: भारताच्या उद्योगक्षेत्रासाठी अतुल्य योगदान देणारे टाटा समूहाचे आधारवड, ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण रतन नवल टाटा यांचे रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या निधनाने अवघा देश हळहळला असून भारताचे उद्योग विश्वातलं रत्न हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री 11.56 वाजता टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक्स पोस्ट करत याबाबत अधिकृत माहिती दिली.

पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार 10 रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.

रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होत. 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष होते. टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुखपदाची धुरा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here