मुंबई,दि.14: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी खळबळजनक दावा केला आहे. माझ्या मोबाईलमध्ये भाजपच्याच एका बड्या नेत्याची अश्लील क्लिप होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही ती क्लिप आपण दाखवली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केला.
त्यांनी माझ्यामागे ईडी लावली, तर मी त्यांच्यामागे साडी लावेन, असं एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना ऑक्टोबर 2020 मध्ये म्हटलं होते. चार वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांनी सांगितलेली सीडी अद्यापपर्यंत बाहेर आलेली नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा करताना खडसे म्हणाले, त्यांनी ईडी म्हटले त्या ओघात मी सीडी म्हटले होते.
बड्या नेत्याची अश्लील क्लिप…
पण माझ्याकडे काही कागदपत्रे आणि क्लिप होत्या, त्यामध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याची अश्लील क्लिप होती. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना मी ती क्लिप दाखवली होती. मुलीसोबत काय चाळे चालले आहेत ते बघा, असे वरिष्ठ नेत्यांना सांगितले होते.
मुलीशी अश्लील चाळे करणारा तो नेता कोण, असा प्रश्न खडसे यांना केला असता त्या नेत्याचं नाव घेणं टाळलं. कोण चाळे करत होतं, त्याचं नाव आता सांगत नाही. तुम्हाला माहीत असलेल्या नेत्यांपैकीच एकाची ती क्लिप होती. माझ्याकडे असलेली ती अश्लील क्लिप माझ्या मोबाईलमधून कशी काय डिलीट झाली काही कल्पना नाही. मुक्ताईवर माझी श्रद्धा आहे. मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो, माझ्याकडे क्लिप होती, असे खडसे म्हणाले.