ग्रंथालयाच्या मागण्यांबाबत शासन निर्णयाचा अध्यादेश लवकरच निघणार: सदाशिव बेडगे

0

सोलापूर,दि.1: मंत्रालयात ग्रंथालयाच्या प्रश्नासंदर्भात नाशिक पदवीधर मतदार संघाचे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे व औसा मतदारसंघाचे आ. अभिमन्यू पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना ग्रंथालय प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली.

ही बैठक दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत दालन क्रमांक 303 मध्ये सकारात्मक व निर्णयाक बैठक झाली. आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी म्हटले आहे.

या बैठकीस आमदार सत्यजित तांबे व आमदार अभिमन्यू पवार, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महेश सोनजे, प्रताप सुर्यवंशी, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ पुणे विभागीय अध्यक्ष सदाशिव बेडगे, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे, राम मेकले, हावगीराव बेरकिळे आदी उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री महोदयांनी ग्रंथालयाच्या प्रश्नासंदर्भात 40% अनुदान वाढ बाबत बोलताना सांगितले की 40% अनुदान वाढवून देणे ही क्रमप्राप्त आहे. त्याची पूर्ण तयारी झालेली आहे लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मंजूर होईल ग्रंथालयाच्या दर्जा वाढ ही शासनाच्या अटीप्रमाणे व नियमाप्रमाणे जे बसतील त्या सर्व ग्रंथालयांचा दर्जा वाढ करण्यात येतील. तसेच नवीन वाचनालयास शासन मान्यता देण्याचे ही आमच्या विचाराधीन आहे.

दर दहा हजार लोकसंख्येला एक वाचनालय आणि आदिवासी भाग तांडा डोंगरी भाग या गावाला पाचशे लोकसंख्येची अट ठेवण्यात आलेली आहे. राज्यात एकूण 1000 नवीन ग्रंथालय मान्यता देण्यात येतील. 40 टक्के अनुदान वाढ ही ग्रंथालय कर्मचाऱ्यांनाच देण्यात येईल, असेही नमूद केले हे सर्व निर्णय सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येतील तसे आदेश प्रधान सचिव विकास रस्तोगी व उपसचिव प्रताप लुबाळ यांना बैठकीत देण्यात आले व मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विषय ठेवण्यासाठी नियोजन करण्यास सांगितले आहे. असे दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात सदाशिव बेडगे यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here