मनोज जरांगे-पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार

0

जालना,दि.8: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे-पाटील यांनी अनेक मोठी आंदोलने केली आहेत. मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत शनिवारपासून पुन्हा एल्गार करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी आपण उपोषणाला बसणार असल्याचा ठाम निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत उपोषणाचा निर्णय मागे घेणार नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी 4 जून रोजीच उपोषणाला बसणार होते. मात्र आंतरवालीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन जातीय सलोखा बिघडत असल्यामुळे उपोषणाला परवानगी देऊ नये, असे निवेदन दिले होते. त्यानंतर पोलिसांनी आचारसंहिता सुरू असल्याच्या कारणावरून उपोषणाला परवानगी नाकारली. त्या वेळी जरांगे यांनी आचारसंहितेचा आदर करत 8 जून रोजी उपोषण सुरू करणार असल्याचे सांगितले होते.

मनोज जरांगे-पाटील उपोषण करण्यावर ठाम

मराठा आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या उपोषणाची रीतसर परवानगी तहसीलदारांकडे मागण्यात आली आहे. परवानगी मिळो न मिळो, माझे उपोषण शनिवारी सकाळी 10 वाजता सुरू होणारच, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. सरकारने गोळय़ा घातल्या, लाठय़ा चालवल्या, अटक केली तरीही या निर्णयात बदल होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. घटनेने मला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे, असेही ते म्हणाले. उपोषणाला परवानगी नाकारून मला कारागृहात टाकण्याचा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here