मुंबई,दि.7: शिंदे गटाचे सहा आमदार ठाकरे गटात येणार असल्याचे वृत्त आहे. विविध वृत्तवाहिनींनी यासंदर्भात वृत्त दिले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला यश मिळाले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. भाजपाला राज्यात मोठा धक्का बसला आहे. भाजपाला फक्त 9 जागेवरच विजेत मिळवता आला आहे.
भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चिन्ह दिसू लागलेली असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, ज्या शिवसेनेतून वेगळं होत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला उदयास आणलं आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्हंही मिळवलं त्याच शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे.
शिंदे गटाला विद्यमान खासदारांच्या जागाही राखता आलेल्या नाहीत. विद्यमान खासदारांपैकी 7 खासदारच निवडून येऊ शकले आहेत. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. त्यामुळेच शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे. हे सहाही आमदार ठाकरे गटात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मविआच्या बाजूनं राज्यातील जनतेनं कौल देत महायुतीला हा मोठा धक्का ठरल्यानं शिंदे गटातील काही आमदार ठाकरे गटाकडे परतणार असल्याचं सांगितलं जात आहे.