या जिल्ह्यातून मराठा समाज एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करणार

0

धाराशिव,दि.17: मराठा समाजाला कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण ओबीसीमधून मिळावे, त्याचबरोबर सगेसोयर्‍यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली लोकशाही मार्गाने लढा सुरु असताना सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकारच्या विरोधातील उद्रेक आता लोकसभा निवडणुकीत दाखवून देणार आहोत. म्हणून धाराशिव लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी (दि.17) पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी लोकसभेचे उमेदवार बलराज रणदिवे, अक्षय नाईकवाडी, निखील जगताप, अभिजित सूर्यवंशी, अमोल जाधव, संकेत सूर्यवंशी, रणधीर सूर्यवंशी, प्रतिक बारकुल, सुधीर पवार व इतर समाजबांधव उपस्थित होते.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन सुरु असताना सरकारकडून दडपशाहीचे धोरण अवलंबले जात आहे. विद्यमान सरकारने दहा टक्के आरक्षण जाहीर केले असले तरी ते कायद्याच्या कक्षेत टिकणार नाही. त्यामुळे कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण ओबीसीमधूनच मिळावे अशी आमची मागणी आहे. परंतु आचारसंहिता लागू झाली तरी आंदोलकांना नोटिसा बजावून गुन्हे दाखल करुन समाजात दहशत माजविण्याचे काम सरकार करत आहे.

त्यामुळे समाजात असंतोषाची लाट उसळली आहे. सरकारता आता धडा शिकवण्यासाठी लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन ते पाच उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. समाजाची ताकद आता सरकारला दाखवून देण्यासाठी सकल मराठा समाजाने ही भूमिका घेतली असून धाराशिव जिल्ह्यातून एक हजाराहून अधिक उमेदवारी अर्ज लोकसभा निवडणुकीत दाखल करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. सदरील उमेदवारांची अनामत रक्कम गावागावातील मराठा कुटुंबातील लोक वर्गणी जमा करून भरणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here