मुंबई,दि.19: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर अनेक आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. जयंत पाटील भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात असून लवकरच ते पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरू होती.
प्रसार माध्यमात जयंत पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे. भाजपाकडून मला अॅाफर आलेली नाही असे त्यांनी सांगितले. भाजपा प्रवेशाबाबत केवळ अफवा आहेत. आमच्यातलं कुणीही भाजपात जाणार नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय. चर्चा होतच असते, ती होऊ द्या असंही त्यांनी म्हंटलंय. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय. त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. मी पक्ष प्रवेश करणार असल्याच्या बातम्या कोठून येतात मला माहिती नाही. भाजपाकडून मला कोणतीही ऑफर आलेली नाही. आमचे लोक कुठेही जाणार नाहीत. मी दिल्लीला गेलो नाही. त्यामुळे दिल्लीत भाजपा नेते सोबत बैठक होण्याचे कारण नाही. मी 15 वर्ष कॅबिनेट राहिलो मला मंत्री पद हे प्रलोभन होऊ शकत नाही असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.