शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

0

गुहागर,दि.16: शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांचे समर्थक भिडले आहेत. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेले माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भास्कर जाधव यांच्यावर सणसणीत टीका केली. त्यांचा समाचार घेण्यासाठी आपण त्यांच्या मतदार संघातच सभा घेऊ आणि तेथेच बोलू, असे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार आज शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता त्यांची शृंगारतळी (ता. गुहागर) येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

निलेश राणे आज चिपळूणमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी गर्दी पांगवली. त्यानंतर परिसरात आता तणावपूर्ण शांतता बघायला मिळत आहे.

निलेश राणे यांचं अतिशय वाजत गाजत भाजप कार्यकर्त्यांनी चिपळूणमध्ये स्वागत केलं. भाजपकडून मोठं शक्तीप्रदर्शन आज करण्यात आलं. पण याच दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही निलेश राणे यांच्या ताफ्यातील काही कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या काचादेखील फुटल्याची माहिती समोर येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here