जगाने पाहिला अभूतपूर्व सोहळा, राम मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना

0

अयोध्या,दि.22: संपूर्ण जगाने अभूतपूर्व सोहळा पाहिला आहे. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला असून त्यासोबतच लोकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षाही संपली आहे. रामलला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. सोने आणि फुलांनी सजवलेल्या रामललाच्या 51 इंची मूर्तीचे पहिले चित्र समोर आले आहे. चित्रात रामललाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि गळ्यात हिऱ्या-मोत्याचा हार आहे. याशिवाय कानात झुमके शोभतात. त्यांच्या हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण असून रामलला पिवळ्या रंगाचे धोतर घातलेले दिसतात.

राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्भगृहात राम लल्लाची पूजा केली आणि त्यानंतर मूर्तीची विधी पूर्ण झाला. दुपारी 12.20 वाजता विधीला सुरुवात झाली. अभिजीत मुहूर्तामध्ये मुख्य पूजा करण्यात आली. हा मुहूर्त काशीचे अभ्यासक गणेशवर शास्त्री द्रविड यांनी तयार केला होता. हा कार्यक्रम पौष महिन्याच्या बाराव्या दिवशी (22 जानेवारी 2024) अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवांशमध्ये पार पडला.

मान्यवरांची उपस्थिती

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व मान्यवर उपस्थित होते. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील सुमारे 7140 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. उद्योगपती मुकेश अंबानी, कुमारमंगलम बिर्ला यांच्यासह उद्योगजगतातील मान्यवर उपस्थित होते. अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, कतरिना-विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते. तसेच सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले. बागेश्वर बाबा यांच्यासह साधू-संत, महंत यांची विशेष उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here