मुंबई,दि.१९: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी कोर्टाने ३० ऑक्टोबरचा अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री यांच्यात दुपारी ही बंदद्वार बैठक झाली. या बैठकीदरम्यान आमदार अपात्रतेबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नवरात्रीच्या सुट्टीच्या काळात वेळापत्रकाबाबत विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले हाेते. त्यामुळे आता सुनावणीचे नवीन वेळापत्रक नार्वेकर यांना तयार करावे लागणार आहे. हे वेळापत्रक कोर्टात सादर झाल्यानंतर आमदार आपत्रतेबाबतचा निर्णयही लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत काय चर्चा झाली हे गुपित कायम असले तरी याबाबत विविध तर्क लढविले जात आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पवित्रा हा आधी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा आहे. त्यानंतरच ते अपात्रतेबाबत निर्णय घेणार असल्याचे दिसते. दोन्ही गटांकडून यासाठी पक्षाच्या घटनाही मागून घेण्यात आल्या आहेत. दोन्ही गटांच्या प्रमुखांनाही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे ही सुनावणी अनिश्चित काळासाठी चालणार असे चित्र असताना कोर्टाच्या आदेशामुळे ही सुनावणी लवकर संपून अपात्रतेवर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बैठकीत त्यादृष्टीनेच चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यांची जाण्याची वेळ झालीय
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केलीय. “सगळा महाराष्ट्र बघतोय. यांची जाण्याची वेळ झालीय. आता काय पालकमंत्र्यांचं घेऊन बसला आहात? अध्यक्षांच्या कृपेने काही काळ, त्यांचं आजचं मरण उद्यावर, उद्याचं परवावर ढकललं गेलं. पण तिरडी तयार आहे. फक्त ते कधी लेटायची यासाठी अध्यक्ष दिवस काढत आहेत. पेशंट गेलेला आहे. पण अध्यक्षांच्या रुपाने त्याला व्हेंटिलेटरवर जीवंत ठेवलेलं आहे. व्हेटिंलेटर काढलं की तो मेला, अशी परिस्थिती होणार”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.