नवी दिल्ली,दि.30: रील बनवण्याच्या नादात गंभीर अपघात होऊन जीव गमावला. सोशल मीडियाच्या या युगात प्रत्येकाला व्हिडिओ बनवून आणि लाईक्स मिळवून लोकांमध्ये लोकप्रिय व्हायचं आहे. जगभरातील दररोज लाखो व्हिडिओ इंटरनेटवर पाहिले जातात. काही लोक लाईक्स मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करताना दिसतात. तर काही लोक व्हिडिओ बनवण्यासाठी धोकादायक ठिकाणं निवडतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात लोकांनी धोकादायक ठिकाणी फक्त काही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी व्हिडिओ बनवले आणि गंभीर अपघात होऊन जीव गमावला.
आता असंच एक हृदय हेलावून टाकणारे प्रकरण उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून समोर आलं आहे. यात जहांगीराबादचा रहिवासी असलेला फरमान आपल्या 3 मित्रांसह मिरवणूक पाहण्यासाठी जात होता. मात्र, मध्येच त्याने रेल्वे क्रॉसिंगजवळ थांबून रुळावर रील बनवायची असल्याचं सांगितलं. त्याच्या मित्रांनीही त्याचं म्हणणं मान्य केलं. काहीही विचार न करता फरमान सरळ रेल्वे रुळावर जाऊन उभा राहिला. रील बनवण्याच्या नादात त्याला मागून येणारी ट्रेन दिसली नाही, त्यामुळे ट्रेनने त्याला जोरदार धडक दिली आणि त्याला चिरडलं.
या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्ट दिसत आहे. फरमान रेल्वे रुळाच्या दिशेनं जात आहे. त्याने कानात ईअरफोन घातल्याचं दिसतं. कदाचित त्यामुळेच त्याला ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नाही. तो रुळाच्या जवळ जाऊ लागताच ट्रेनने त्याला जोरदार धडक दिली. धडकल्यानंतर ती व्यक्ती उडून ट्रेनच्या चाकाखाली येते. येथे आश्चर्याची बाब म्हणजे, त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या मित्रांचं तोंड रेल्वेकडे असतानाही त्यांना ट्रेन का दिसली नाही?
व्हिडिओच्या कॅप्शननुसार, या घटनेत फरमानचा मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनामुळे त्याचं कुटुंबच नाही तर मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांचा विश्वास बसत नाही, की त्यांनी त्यांचा मित्र गमावला आहे. वृत्तानुसार, फरमानचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.