सोलापूर,दि.१८: खुनी हल्ल्याप्रकरणी पितापुत्रास अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. यात हकिकत अशी की, सोलापूर येथील रहिवासी पांडुरंग देशमुख व त्यांचा मुलगा दिग्विजय पांडुरंग देशमुख यांच्यावर फिर्यादी यांच्यावर घरात घुसुन खुनी हल्ला केल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. यात सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी व त्यांची सासू हे त्यांच्या पतीच्या नावे असलेल्या त्यांच्या भाडयाने दिलेल्या घरी गेले असता तेथील बाजूला असणाऱ्या मोकळया जागेत पांडूरंग देशमूख हे पत्राशेड मारत होते व त्याबाबत फिर्यादीने त्यांच्याकडे याबाबत विचारणा करुन कागदपत्रांची मागणी केली.
तेव्हा पांडुरंग देशमुख यांचा मुलगा दिग्विजय याने फिर्यादी यांच्या घरात घुसुन खुनी हल्ला चढविला व पांडुरंग देशमुख यांनी त्यास प्रोत्साहन दिले तसेच फिर्यादीच्या गळयातील २ तोळयाचे मिनी गंठण हिसकावून घेतले व फिर्यादीची सासू भांडण सोडविण्यासाठी आली असता तिला सुध्दा शिवीगाळ करुन मारहाण केली. अशा आशयाची फिर्याद विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली.
सदर कामी अटकपूर्व जामीन मिळण्यापोटी सदर आरोपींनी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.
खुनी हल्ल्याप्रकरणी पितापुत्रास अटकपूर्व जामीन मंजूर
यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, स्वत:च्या जागेत शेड मारणे हा काही गुन्हा नाही व त्या जागेचे आरोपी हे कायदेशीर मालक आहेत. यातील आरोपी हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यामुळे त्यांच्या अनेक ठिकाणी जागा आहेत. ते स्वत:च्या जागेत शेड मारत असताना यातील फिर्यादी व त्यांच्या सासूने येवून त्यास मुद्दामहून हरकत अडथळा केला. त्या हरकत अडथळयास सदर संशयितांनी भीक घातली नसल्यामुळे तसेच सदर जागेत पत्रा शेड उभारल्यामुळे रागापोटी सदरची खोटी फिर्याद दाखल केली. सदर युक्तीवादाच्या वेळेस आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.
सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते मॅडम यांनी आरोपी नामे पांडुरंग देशमुख व दिग्विजय देशमुख या पिता-पुत्रांची अटकपूर्व जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. दिपक टक्कळगी, ॲड. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.