दि.४: देशात व महाराष्ट्रात लसीकरण सुरू आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात लसीकरण जास्त प्रमाणात झाले आहे तर काही जिल्ह्यात कमी प्रमाणात झाले आहे. करोना संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या लशींच्या मात्रा वाया जाऊ नयेत यासाठी त्याचे योग्य नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश लसीकरण मोहीम राबवताना देण्यात आले होते. मात्र राज्यात कोव्हॅक्सिनच्या ०.७२ टक्के मात्रा वाया गेल्या आहेत. नंदूरबारमध्ये कोव्हॅक्सिनच्या मात्रा वाया जाण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे १२.२९ टक्के असून, रायगड जिल्ह्यात कोव्हिशील्डच्या सर्वाधिक म्हणजे २.६७ टक्के मात्रा वाया गेल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
आरोग्य कार्यकर्ते सुरेश पाटील यांना याबाबतची माहिती मिळाली. जानेवारीमध्ये लसीकरण सुरू झाले, तेव्हा कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशील्ड लशीची मात्रा घेण्याकडे अनेकांचा कल होता. कोव्हॅक्सिनही कोव्हिशील्ड इतकीच परिणामकारक आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर या मात्रेसाठीचा प्रतिसादही वाढला. कोव्हॅक्सिनचे दोन मात्रांमधील अंतरही कमी आहे. तरीही ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये लशींना कमी प्रतिसाद होता. त्यामुळे नंदूरबारसारख्या भागात कोव्हॅक्सिनच्या मात्रा वाया जाण्याचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोग्य विभागातील वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये शीतसाखळीचे व्यवस्थापन करणे, विजेची समस्या हे अडचणीचे मुद्दे होते. मात्रा मुदतीत न दिल्यास त्या वाया जाण्याची शक्यताही अधिक असते. याशिवाय लशींसदर्भातील गैरसमजांमुळेही ग्रामीण व आदिवासी भागामध्ये लसीकरणाची प्रक्रिया धीमी होती.
बीड, बुलढाणा, सातारा, चंद्रपूर, धुळे, वर्धा, जालना, अकोला, नागपूर, नंदूरबार, गडचिरोली, भंडारा, वाशिम, नांदेड येथे राज्याच्या सरासरीपेक्षा कमी लसीकरण झाले आहे. पालघर, मुंबई, सोलापूर, ठाणे, जळगाव, उस्मानाबाद, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, सांगली, नाशिक, रत्नागिरी, रायगड येथे सरासरी लाभार्थींची संख्या अधिक आहे.
लशीच्या मात्रा वाया जाण्याचे प्रमाण
जिल्हा – कोव्हॅक्सिन – कोव्हिशील्ड
रायगड १.६६ २.६७
यवतमाळ २.१७ २.६६
पुणे ३ १.७२
नंदूरबार १२.२९ १.४३
गडचिरोली ३.५५ १.३७
कोल्हापूर २.१ ०.१८
जिल्हा एकूण मात्रा टक्केवारी
मुंबई १,४७,३०,२१८ १४.९५
पुणे १,२१,२७.४४४ १२.३१
ठाणे ८२,६३,२३६ ८.३९
नाशिक ४७,९९,६५४ ४.८७
नागपूर ४४,८१,४८६ ४.५५