सोलापूर,दि.३०: बोगस कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपल्याप्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यात हकिकत अशी की, मौजे बिबेवाडी जि. पुणे येथील रहिवासी समीर युनुस तांबोळी यांच्या वडिलांची मौजे बिटले ता. मोहोळ येथे वडिलोपार्जित जमीन होती. वर्ष २०२० मध्ये सदर समीर तांबोळी यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे संशयित समीर तांबोळी यांनी स्वत:चे व भावंडांची नावे सदर जमीनीवर लावण्यासाठी गावातील तलाठी यांच्याकडे रितसर अर्ज दिला. त्याप्रमाणे सदर अर्जावरती सुनावणी होवून सदर संशयित आरोपी समीर तांबोळी व त्यांच्या भावंडांची नावे सदर जमीनीच्या ७/१२ वर घेण्यात आली. तद्नंतर त्याच गावातील इसम नामे युनुस तांबोळी यांनी सदर नाव लावण्यावरती लेखी हरकत घेतली. त्या लेखी हरकतीवर सुनावणी घेण्यात आली परंतु सदर सुनावणी वेळेस सदर संशयित आरोपी समीर युनुस तांबोळी हे हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे सदरचे प्रकरण उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग-पंढरपूर यांच्याकडे पाठविण्यात आले.
परंतु सुनावणीवेळी सदर संशयित आरोपी समीर तांबोळी हे हजर न राहिल्यामुळे तसेच वकिलांमार्फत कुठलेही लेखी म्हणणे न मांडल्यामुळे तत्कालीन तलाठी मौजे बिटले ता. मोहोळ श्री. दादासाहेब विलास सरक यांनी मोहोळ पोलीस स्टेशन येथे सदर संशयित आरोपी समीर तांबोळी यांचेविरुध्द अशी फिर्यादी दिली कि, सदर जमीनीवर नाव लावतेवेळी आरोपी समीर तांबोळी यांनी त्यांच्या वडिलांसंबंधित खोटी कागदपत्रे तयार करुन व त्याचा वापर करुन खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले व सदर जमीन बेकायदेशीररित्या हडप करण्यासाठी सदरचा अर्ज दिला. अशाप्रकारे समीर तांबोळी यांचेविरुध्द मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर संशयित आरोपी समीर तांबोळी यांनी अटक होण्याच्या भितीपोटी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत मा. सत्र न्यायालय, सोलापूर येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. युक्तीवाद करतेवेळी आरोपीतर्फे पुणे महानगरपालिकेमधील मयत युनुस बंडूभाई तांबोळी यांच्या संबंधित काही महत्वाची कागदपत्रे दाखल केली. व असे म्हणणे मांडले की, सगळी कागदपत्रे हि खरी असून कुठलाही कागद खोटेपणाने तयार केलेला नाही त्यापोटी आरोपीने पुणे महानगरपालिकेचे पत्र व मयताचे मयत प्रमाणपत्र हि दाखल केले.
सदरचा युक्तीवाद ग्राहय धरुन सत्र न्यायाधीश, सोलापूर यांनी सदर संशयित आरोपी समीर तांबोळी याची अटकपूर्व जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. राम शिंदे, ॲड. संतोष आवळे, ॲड. फैयाज शेख, ॲड. सुमित लवटे यांनी काम पाहिले.