मुंबई,दि.३०: Devendra Fadnavis On Thackeray Group: ठाकरे गटाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. संपूर्ण ठाकरे गटच तीन ते चार लोकांमुळे अस्वस्थ आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. आज सामनाच्या अग्रलेखात शिंदे गटाचा उल्लेख भाजपाने खुराड्यात पाळलेल्या कोंबड्या आणि १३ तुर्रेबाज कोंबडे असा खासदारांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच मिंधे गटात २२ आमदार आणि नऊ खासदार अस्वस्थ आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाविषयी सूचक वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? | Devendra Fadnavis On Thackeray Group
“संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे. तीन-चार लोकांमुळे तिथे एवढी अस्वस्थता आहे त्याच ठाकरे गटातल्या की त्याच संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
कोर्टाच्या निकालाबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, “शिवसेना किंवा एनसीपी असेल त्यांना माहित आहे की पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्यं केली जात आहेत. पण अशा प्रकारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो.”
प्रत्येक पक्षाला आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल. त्याबद्दल काय बोलणार? असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. १९ जून रोजी ठाकरे गट वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे तर शिंदे गटाने वेगळी तयारी केली आहे. त्यावरुन प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे.