पुणे,दि.22: पुण्यात 3 जणांविरोधात चप्पल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या अनेक घटना घडतात. गुन्हेही दाखल होतात. मात्र चप्पल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चप्पल चोरल्याच्या प्रकरणात तीन जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर दत्ता चांदणे, आकाश विक्रम कपूर आणि अरबाज जाफर शेख असं या तीन चप्पल चोराचं नाव आहे. त्यांच्याविरोधात पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात चप्पल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चप्पल चोरीचा गुन्हा दाखल
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील खडकी भागात असलेल्या मुस्लिम बँकेच्या समोर फिर्यादी हरेश अहुजा यांचं चपलेचं दुकानं आहे. अहुजा हे रात्री दुकान बंद करून घरी गेल्यानंतर आरोपींनी रात्रीच्या सुमारास हे दुकानं फोडलं. त्यांनी दुकानातून तीस बुटांचे तर पंधरा चपलेचे जोड चोरले. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आपल्या दुकानात चोरी झाल्याचं अहुजा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अहुजा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरोपींनी चपलाचं दुकान फोडलं. त्यानंतर त्यांनी दुकानातून चप्पल आणि बुटाची चोरी केली. चोरीचा माल घेऊन जाताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दुकानात चोरी झाल्याचं लक्षात येताच दुकानाचे मालक हरेश अहुजा यांनी तक्रार दिली. हरेश अहुजा यांच्या तक्रारीवरून आरोपी सागर दत्ता चांदणे, आकाश विक्रम कपूर आणि अरबाज जाफर शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.