Jayant Patil: संतापून जयंत पाटील यांचा विधानसभा अध्यक्षांसाठी अपशब्दाचा वापर

Jayant Patil News: संतापून जयंत पाटील यांनी वापरला विधानसभा अध्यक्षांसाठी अपशब्द

0

नागपूर,दि.22: संतापून राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांसाठी अपशब्दाचा वापर केला. विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याच्या संतापात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जयंत पाटील (Jayant Patil News) यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्यानंतर मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी बाकांवरून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

काय म्हणाले जयंत पाटील? | Jayant Patil News

हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विरोधकांचा सामना रंगला आहे. बोलू दिलं जात नसल्यामुळे विरोधकांनी मागणी केली, पण तरीही बोलू न दिल्यामुळे, अध्यक्ष महोदय, असा निर्लज्जपणा करू नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला.

Jayant Patil News

अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

हिवाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दिशा सालियान प्रकरणावर विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. अजित पवार यांनीही बोलू देण्याची मागणी केली, पण नार्वेकर यांनी नकार दिला.

ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी…

आक्रमक होणाऱ्या विरोधी पक्षाला विशेषत: शिवसेना ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून दिशा सालियानच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशीची मागणी लावून धरली. या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत शाब्दिक खडाजंगीदेखील झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला होता.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी, सायंकाळी लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी बिहार पोलिसांच्या चौकशीचा दाखल देत आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. त्यानंतर आज विधीमंडळ अधिवेशनातही सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी चौकशीची मागणी केली जाण्याची अटकळ बांधण्यात येत होती.

नेमकं काय घडलं?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. ही मागणी अध्यक्षांनी फेटाळली. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला संधी दिली होती, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. त्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाला. सत्ताधारी बाकावरून 14 जणांना बोलण्याची संधी दिली आणि विरोधी बाकावरून एका सदस्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे अशी मागणी करण्यात येत होती. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असे म्हटले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणखीच आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांकडून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी केली. सभागृहात गोंधळ वाढल्यानंतर कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here