मुंबई,दि.3: जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या भालचंद्र भोईर (Bhalchandra Bhoir) यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भालचंद्र भोईर यांना अंबरनाथमधील समीर गोसावी यांच्या हत्या प्रकरणात (Sameer Gosavi murder case) न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भालचंद्र भोईर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. असं असतानाही भाजपनं त्यांना प्रवेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भालचंद्र भोईर जामीनावर आहेत बाहेर
समीर गोसावी यांची व्यावसायिक वादातून अंबरनाथमध्ये 2009 साली हत्या झाली होती. या प्रकरणात भालचंद्र भोईर यांच्यासह त्यांच्या भावांना अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने त्यांना या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अनेक वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर भालचंद्र भोईर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामीन मिळवला होता. मागील दीड ते दोन वर्षांपासून भालचंद्र भोईर हे जामीनावर बाहेर असून महिन्यातून एकदा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ते हजेरी देण्यासाठी येतात.
भालचंद्र भोईर आणि मनीषा भोईर यांचा भाजपात प्रवेश
मात्र, आता त्यांनी थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत हा प्रवेश करण्यात आला. भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा भालचंद्र भोईर यांनीही भाजपात प्रवेश केला असून त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. हत्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगाराला भाजपने थेट प्रवेश दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
अंबरनाथमधील शिवसेनेचे नगसेवक पंढरीनाथ वारींगे यांचा भाचा समीर गोसावी (Sameer Gosavi murder case) ) यांची 2009 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी भालचंद्र भोईर यांच्यासह इतर 11 आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयात खटला सुरू करण्यात आला. खटला सुरू असताना जितेंद्र भोईर आणि शैलैश कुलकर्णी या दोन आरोपींचा मृत्यू झाला होता. तर कल्याण सत्र न्यायालयाने प्रदीप दुबे आणि विनोद खुळे यांची निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणी भालचंद्र भोईर, प्रकाश भोईर, अरुण भोईर, मधुकर भोईर, गणेश भोईर, मंगेश भोईर, महेंद्र भोईर या सर्वांना 2017 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. भोईर हे सध्या जामिनावर तुरूंगाबाहेर आहेत.