नवी दिल्ली,दि.५: एबीपी-सी व्होटरने गुजरातमध्ये जनमत चाचणी घेतली आहे. गुजरातमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांत १३१ ते १३९ जागांवर विजय मिळवून भाजप सत्ता आपल्याच हाती राखण्यात यशस्वी होईल, असा अंदाज एबीपी व सी व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीतून वर्तविण्यात आला आहे. या निवडणुकांत काँग्रेसला ३१ ते ३९ तर आप व इतर पक्षांना १२ ते १७ जागा मिळतील, असेही या जनमत चाचणीच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निष्कर्षांत म्हटले आहे.
१८२ सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेमध्ये बहुमत मिळविण्यासाठी ९२ जागांवर विजय मिळविणे आवश्यक आहे. एबीपी – सी व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीच्या निष्कर्षांतून असा कल दिसत आहे की, गुजरातचे लोक आप पक्षाला कदाचित भरभरून मते देणार नाहीत. गुजरातमधील विधानसभा निवडणुका येत्या १ व ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत होणार असून, ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.
पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला हरवून आप पक्ष सत्तेवर आला होता. आता आपने गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. गुजरातमध्ये गेली अनेक वर्षे भाजप सत्तेवर आहे. प्रस्थापित सरकारविरोधात जनमत तयार होऊन निवडणुकांत मतदार दुसऱ्या पक्षाच्या हाती सत्ता सोपवितो असे अनेकदा दिसून आले आहे. मात्र, गुजरातमध्ये भाजपविरोधात जनमत तयार झाले आहे, असा दावा करूनही काँग्रेस त्या राज्यातील गेल्या काही विधानसभा निवडणुकांत भाजपला हरवू शकली नव्हती.
आम आदमी पक्षाने (आप) गुजरातमधील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून माजी टीव्ही अँकर व पत्रकार इसुदान गढवी यांच्या नावाची शुक्रवारी घोषणा केली. विधानसभेची पुढील महिन्यात निवडणूक आहे. मुख्यमंत्री कोण असावा? यासाठी पार्टीने सर्वेक्षण केले होते. यात जवळपास १६ लाख ४८ हजार ५०० नागरिकांनी सहभाग घेतला. ७३ टक्के लोकांनी गढवी हे मुख्यमंत्री असावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी गढवी यांच्या नावाची घोषणा केली.