मुंबई,दि.२९: नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड अशी खोचक टीका दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. ‘अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या घरचे दिवे अजूनही विझलेलेच का आहेत, याचे उत्तर कृषीमंत्र्यांच्या या प्रश्नात दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषेतील हा ‘सकारात्मक’ बदल राज्यात घडत आहे तो मिंध्यांनी तीन महिन्यांपूर्वी सामना जिंकल्यामुळेच!,’ असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, यादरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना “दारू पिता का?” अशी विचारणा करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली. आता ठाकरे गटाकडून राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावण्यात आला आहे. एकनाथ शिंदेंचा उल्लेख ‘मिंधे’ असा करत ‘सामना’ अग्रलेखातून सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे.
‘ऋषी सुनक या भारतीय वंशाच्या तरुणाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. हा नवा इतिहास रचला गेला तो कोणामुळे? अर्थात आपले पंतप्रधान मोदी व महाराष्ट्रातील मिंधे-फडणवीस यांच्या सरकारमुळे. सुनक यांनाच पंतप्रधानपदी नेमून भारतावरील लादलेल्या गुलामीचे प्रायश्चित्त घ्यावे असे एक पत्र महाराष्ट्रातून मिंधे-फडणवीसांना लिहिले गेले. ते पत्र रातोरात मुंबईतील ब्रिटन उच्चायुक्तांच्या कार्यालयात पोहोचवून त्याच्या अंमलबजावणीच्या जबाबदारीचे वाटप झाले. आपण ब्रिटनच्या पंतप्रधानपदी बसावे, यासाठी महाराष्ट्रात पडद्यामागे काय काय हालचाली झाल्या याची त्या सुनक साहेबांना कल्पनाही नसेल”, अशा शब्दांत सामना अग्रलेखातून टोला लगावण्यात आला आहे.
अग्रलेखात शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असा करत टीका करण्यात आली आहे. ‘मिंधे गटाने जो सामना तीन महिन्यांपूर्वी जिंकला त्या गटातील खेळाडू अचानक कुबेर बनले. त्या कुबेरांचे लक्ष्मीपूजन काही ठिकाणी झाले. या चाळीस जणांमुळे ‘सामना’ जिंकल्याचा आनंद असा की, एका दिवसात १९०० किलो सोन्याची खरेदी झाली. हे सर्व मिंधे-फडणवीस सरकारमुळेच घडले”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, भारताने पाकिस्तानविरुद्ध टी-२० वर्ल्डकपमध्ये जिंकलेल्या सामन्यावरूनही अग्रलेखातून टोला लगावला आहे. ‘ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना आपण जिंकू शकलो. विराट कोहलीने एकदम धुवाधार फटकेबाजी केली. पण महाराष्ट्रात मिंधे गटाने तीन महिन्यांपूर्वी ‘सामना’ जिंकून जगात चैतन्य पर्व निर्माण केले नसते तर भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘बॅटी’ होळीत टाकण्याच्या लायकीच्याही राहिल्या नसत्या. भारताने मेलबर्न जिंकले याचे श्रेय मिंधे व फडणवीस यांनाच द्यावे लागेल. जगात सर्व काही घडते आहे ते त्यांचे सरकार आल्यामुळेच”, असं यात म्हटलं आहे.