अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर अपघात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल

0

अककलकोट,दि.24 सोलापूर गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली आहे. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या आहेत.

अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर एसटी बसला अपघात झाला आहे. सोलापूर ते गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर देशमुख शेतालगत एसटी बस पलटी झाली.

एसटी बसमधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना अककलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार चार ते पाच प्रवाशांची प्रकृती ही गंभीर असल्याची देखील माहिती आहे. यातील काही रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात देखील हलविण्यात येत असल्याची माहिती आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here