मुंबई,दि.23: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना झेड सुरक्षा नाकारली का? यावर दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुहास कांदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. या दरम्यान गडचिरोलीतून नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. त्यानंतर गृहविभागाने शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला.
एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यावेळेस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा दावाही सुहास कांदे यांनी केला.
एका मराठी माणसाला नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिली गेली, तरीदेखील त्यांची सुरक्षा व्यवस्था का नाकारण्यात आली. मात्र, जे हिंदुत्वाविरोधात होते, त्यांना सुरक्षा व्यवस्था का दिली असा सवालही त्यांनी केला. याकूब मेननच्या फाशीला विरोध करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अस्लम शेख, नवाब मलिक यांच्यासोबत सत्तेत बसायचे का, असा सवालही त्यांनी केला.
सुहास कांदे यांच्या आरोपावर दिलीप वळसे पाटील म्हणाले
महाविकास आघाडी सरकार काळात एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र, त्यानंतरही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदेना झेड प्लस सुरक्षा देण्याचं नाकारलं असल्याचा दावा बंडखोर आमदार सुहास कांदेंनी केला आहे. तर बंडखोर आमदारांकडून करण्यात आलेल्या या आरोपात तथ्य नसून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना दिली नसल्याचे स्पष्टीकरण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे.