मुंबई,दि.8: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर एनसीबीने धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचाही समावेश आहे. दरम्यान एनसीबीच्या (NCB) कारवाईवर नवाब मलिकांनी काही गंभीर आरोप करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आजही त्यांनी या प्रकरणी एक गौप्यस्फोट केला आहे. या कारवाई दरम्यान भाजप नेत्याच्या एक मेहुण्याला सोडून दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
क्रूझवरील ड्रग्स पार्टीतून ताब्यात घेतलेल्यांपैकी दोन जणांना सोडण्यातं आलं असं म्हणत त्यात भाजप नेत्याच्या एका मेहुण्याला सोडून देण्यात आल्याचा नवाब मलिकांनी आज केला आहे. भाजप नेत्याचा मेहुणा कारवाईतून कसा सुटला? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे.
तसंच उद्या 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. उद्याच्या पत्रकार परिषदेत व्हिडिओसह माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या सर्व पुरावे सादर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
पुढे नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिली होती की 8 ते 10 लोकांना पकडलं आहे. त्यावेळी मी प्रश्न विचारले होते एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो. जर 10 लोकांना पकडले असेल तर कदाचित 2 लोकांना सोडलं असेल. आता हे खरं असल्याचं समोर आलं आहे. जी दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपचे एका नेत्याचा मेहुणा त्यामध्ये होता. त्याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे. त्या दोन लोकांना आणण्यात आला होतं आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आलं असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.
भाजपचा कोण नेता आहे त्याचं नाव उद्या मी घोषित करणार आहे. आज इतकंच सांगेल की तो हायप्रोफाईल नेता आहे. त्यानंच सगळं गॉसिप केलं आहे. पहिल्यांदा म्हटले की यामध्ये राजकीय व्यक्ती आहे. त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा असा माझा सवाल आहे. त्यांना याच उत्तर द्यावंचं लागेल, असंही नवाब मलिक म्हणालेत.