कल्याण,दि.20: शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात सामिल होत आहेत. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहत झाली असून मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकावर हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. कल्याण शहरातील शिवसेनेचे उपशहर प्रमुखावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण शहरातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला. शिवसेनेत खूप पुढे पुढे करतो, असं म्हणत अज्ञात हल्लेखोर हल्ला केल्याचे पालांडे यांनी सांगितले.
शिंदे समर्थक महेश गायकवाड यांनी हा हल्ला केल्याचा आरोप पालांडे यांनी केला आहे. मात्र गायकवाड यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
पालांडे हे कल्याण पूर्व भागाच्या संतोषी माता रोड परिसरातून गाडीने जात होते. या वेळी तीन ते चार हल्लेखोरांनी त्यांना गाडीतून बाहेर खेचत तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला केला. तलावर आणि लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला आहे. पालांडे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या हल्ल्यानंतर कल्याण शहरात शिवसैनिक आणि शिंदे समर्थक यांच्यात तणावाचे वातावरणात निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पालांडे हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहे. आपल्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल पालांडे यांनी शिंदे समर्थक असलेले माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर आरोप केला आहे. पण महेश गायकवाड यांनी आरोपाचे खंडन केले आहे. पालांडे यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे. पण या हल्ल्याचा माझा कोणताही संबंध नाही. माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे, पोलिसांनी योग्य तो तपास करावा. वेळ आली तर न्यायालयातही दाद मागू अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली.