अंबरनाथ,दि.6: शिवसेना बंडखोर आमदार आणि महिला शिवसैनिकात शाब्दिक बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कायम राहण्याचा निर्धार अनेक जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले असताना देखील अजूनही त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शिवसैनिकांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
शिवसेनेतील अंतर्गत वादाचे पडसाद आज अंबरनाथमध्ये दिसून आले. अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची महिला शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महिला शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आमदार किणीकर यांना काढता पाय घ्यावा लागला.
आमदार बालाजी किणीकर हे आज विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी अंबरनाथ पालिकेत आले होते. पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू होती. मात्र याच वेळी आमदार किणीकर यांनी शिवसेना महिला आघाडीला न विचारता थेट मुख्याधिकारी यांची केबिन गाठली, असा आरोप महिला शिवसैनिकांनी केला.
या बैठकीला शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना का बोलवण्यात आले नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. आम्ही शिवसैनिक नाहीत का असा सवालही त्यांनी केला. तुम्ही स्वत: वेगळा गट केलात, इथं बैठकाही वेगळ्या घेत आहात असा प्रश्न या महिला शिवसैनिकांनी केला. यावेळी आमदार किणीकर आपली बाजू मांडत होते.
मात्र, महिला शिवसैनिकांची आक्रमक भूमिका पाहता आमदारांनी काढता पाय घेतला. आमदार पालिका कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर महिला शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात ही घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आमदार किणीकर यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे म्हटले.
अंबरनाथमध्ये झालेल्या या सगळया प्रकरणानंतर येत्या काळात एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या बंडखोर आमदार, त्यांचे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये अशाच प्रकारची धुमश्चक्री होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंगळवारपासून शिंदे गटातील अनेक आमदार आपल्या मतदारसंघात परतले आहेत. या बंडखोर आमदारांच्या समर्थकांकडून त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. तर, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या जात आहेत.