शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात का जात आहेत हे लवकरच कळेल; संजय राऊत यांचं सूचक विधान

0

मुंबई,दि.23: शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात का जात आहेत हे लवकरच कळेल असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. जे आमदार सोडून गेले ती खरी शिवसेना नाही, तर काल वर्षा निवासस्थान सोडून मुख्यमंत्री मातोश्रीवर जात असताना जे रस्त्यावर जे कार्यकर्ते होते, तो खरा शिवसेना पक्ष, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. जे आमदार गुवाहाटीला (Guwahati) गेले आहेत, त्यातले 18 ते 20 आमदार अजूनही आमच्या संपर्कात असल्याचा दावाही यावेळी राऊतांनी केला. आज दोन आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. ते तुम्हाला सगळी कहाणी सांगतील असंही राऊतांनी सांगितलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “ईडीच्या किंवा इतर काही अमिषांना बळी पडून जर आमदार काही पळाले असतील, विशेषतः ते स्वतःला बछडे आणि वाघ वैगरे म्हणून घ्यायचे, तर ते म्हणजे पक्ष नाही. आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. हा पक्ष अद्याप मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उभा आहे. 4 आमदार, अजून कोणी दोन खासदार, दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत. हे का गेलेत सोडून, याची कारण लवकरच समोर येतील.”

“सोडून गेलेल्या काही आमदारांशी आमच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्यातील काहीजण अद्यापही आमच्या संपर्कात आहेत. ते सांगतात, आम्हाला कसं जबरदस्तीनं नेलंय तिकडे. आज आमच्या दोन आमदारांची पत्रकार परिषद आहे. नितीन देशमुख आणि कैसाल पाटील तुम्हाला सगळी कथा सांगतील. अशाप्रकारे किमान 17 ते 18 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत.” असं संजय राऊत म्हणाले. मी भारतीय जनता पक्ष हाच शब्द वापरतोय. कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही, असा घणाघाती आरोपही संजय राऊतांनी भाजपवर केला आहे.

“20 आमदार आमच्या संपर्कात असून ते मुंबईत आल्यानंतर खुलासा होईल. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता तुम्हाला दिसणार नाही. आम्हाला अशा परिस्थितीचा अनुभव आहे. आपण बाळासाहेबांचे भक्त आहोत इतकं म्हणणं पुरेसं नाही. दबावाला बळी पडून जर कोणी पक्ष सोडत असेल तर तो बाळासाहेबांचा भक्त असू शकत नाही. आमच्यावरही दबाव आहे. आमचा एक मंत्री चार दिवस ईडीच्या कार्यालयात जाऊन बसतोय, पण त्यानं पक्ष सोडला नाही. मी आणि माझ्या कुटुंबावरही ईडीचा दबाव आहे. पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटुंबासोबत राहणार”, असं संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here