मुंबई, दि.18: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरून केंद्रीय तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणूकीत भाजपाने विजय संपादन करत महाविकास आघाडीला झटका दिला. सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण झाली होती. यात शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव करून भाजपाचे धनंजय महाडिक विजयी झाले.
पुरेसं संख्याबळ असताना देखील महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीवरून दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. 20 जून रोजी 10 जागांवर विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांना फोन येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबतचे फोन रेकॉर्डींग आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना पटोले म्हणाले की, “केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या काही आमदारांना फोन करत आहेत. ते फोन कसे करत आहेत, याचं रेकॉर्डींग आमच्याकडे आहे. योग्य वेळी आम्ही हे रेकॉर्डींग दाखवू. केंद्रीय तपास यंत्रणांकडून फोन करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण अशा दबावाला कुणी घाबरणार नाही,” असंही पटोले म्हणाले.
नाना पटोले यांच्या आरोपानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोलेंचं विधान म्हणजे २० तारखेला लागलेल्या निकालाचं लक्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “नाना पटोलेंचं हे जे म्हणणं आहे, ते जवळजवळ २० तारखेचा निकाल लागण्याचं लक्षण आहे. २० तारखेला काँग्रेसची एक जागा हरल्यानंतर जी कारणं द्यावी लागतात, त्याची स्क्रीप्ट नाना पटोले आताच तयार करत आहेत,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.