दि.8: Video: उदघाटनावेळी पुल तुटल्याने महापौर कार्यकर्त्यांसह गटारात पडल्याची घटना घडली आहे. मेक्सिको सिटी – एका पुलाच्या उदघाटनासाठी शहराच्या महापौरांसह इतर अधिकारी पोहोचले होते. जेव्हा ते पुलावर चढले तेव्हा हा पूल तुटला आणि महापौरांसह सुमारे २० ते २५ लोक खाली गटारात पडले. आता या घटनेचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
हा प्रकार मेक्सिकोमधील क्वेर्निवाका येथील आहे. शहराचे महापौर नदीवर बांधलेल्या एका फुटब्रिजचे उदघाटन करत होते. वुडन बोर्ड्स आणि मेटल चेन्सपासून बनवलेले हे पुल नव्याने बांधण्यात आले होते. दरम्यान, चेन बोर्ड्सपासून वेगळ्या झाल्याने हा अपघात झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पुल तुटल्याने शहरातील कौन्सिल मेंबर्स आणि इतर स्थानिक अधिकारी ३ मीटर खाली नाल्यात असलेल्या दगडांवर पडले. मोरेलोस राज्याच्या गव्हर्नरनी सांगितले की, नाल्यामध्ये पडलेल्यांमध्ये महापौर, त्यांची पत्नी, इतर अधिकारी आणि काही पत्रकारांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनेकांना दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार महापौर जोस लुईस उरिस्तेगुई यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. क्षमतेपेक्षा अधिक लोक पुलावर चढल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला आहे, ज्यामध्ये अनेक लोक नाल्यामध्ये पडताना दिसत आहेत. तसेच त्यांना तिथून बाहेर काढतानाही दिसत आहे.