दि.8: शिवसेना नेते मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb दानवे) यांच्या मुलाबाबत खळबळजनक दावा केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपाने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपाने आपल्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. मत फुटू नये यासाठी सर्वच पक्षांकडून काळजी घेण्यात येत आहे. शिवसेनेनं काल आपल्या आमदारांना एका हॉटेलमधून दुसऱ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवलं होतं.
याच मुद्यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारमधील आमदारांची अवस्था मांजरांच्या पिल्लांसारखी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दुसऱ्या पक्षाची मतं फोडण्याऐवजी दानवे यांनी आपल्या घरातील मत सुरक्षित ठेवावं. रावसाहेब दानवे यांचा मुलगाच आपल्याला मतदान करेल, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला आहे. सत्तार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार म्हणाले की, “महाविकास आघाडीची मतं फोडण्याच्या घोषणा काही लोक करत आहेत. त्यामुळे माझं रावसाहेब दानवेंना थेट आवाहन आहे की, त्यांनी आपल्या घरातील मत सुरक्षित ठेवावं. दानवे यांचा मुलगाच आम्हाला मतदान करेल, त्यांनी आमची मतं फोडण्याऐवजी आम्हीच त्यांची मतं फोडू, असंही सत्तार यावेळी म्हणाले. दानवे यांचे पूत्र संतोष दानवे हे भोकरदन मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले आहेत.