दि.२३: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुण्यातील सभेचे शिवसेना नेत्याने कौतुक केले आहे. पुण्यातील सभेत अनेक मुद्द्यावर राज ठाकरे बोलले. यावेळी राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द करण्याचे कारण सांगितले. सापळा रचून अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यात आल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. कुणी तरी खासदार उठतो आणि विरोध करतो, त्याला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. १०-१२ वर्षी काय झोपले होते का? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. आपण अयोध्येला गेलो असतो आणि विरोध झाला असता तर आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अडकवण्याचा डाव होता. असा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरेंच्या या विधानानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी सांगितले ते सत्य ठरले. अयोध्येत गेलो असतो तर केसेस टाकल्या असत्या. कोणी? योगी सरकारने.. तीथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही. विरोध करणारा भाजपाचाच हा ट्रॅप महाराष्ट्रातील भाजपानेच रचला, हे राज ठाकरे यांचंही मत आहे, असं सचिन सावंत म्हणाले.
शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, असं म्हणत त्यांनी टीका केली होती. मात्र याचदरम्यान शिवसेनेचे रत्नागिरीमधील ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे कौतुक केले आहे. राज ठाकरेंचे भाषण हे राजकीयदृष्या प्रगल्भतेचे आणि वैचारिक पद्धतीचे होते, असं भास्कर जाधव म्हणाले. तसेच राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे गांभीर्याने पाहावे. राज ठाकरेंच्या भाषणाची चेष्टा करु नये, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
“भाजपा जी बी टीम, सी टीम करत होती. तर त्यातली सी टीम आज भाजपाकडून दूर करण्याच्या दृष्टीने या सभेकडे बघितलं पाहिजे. राज यांना हिणवण्याच्या दृष्टीने बघता कामा नये,” असं मत भास्कर जाधावांनी व्यक्त केलंय. “एमआयएम ही बी टीम आहे. ओवैसींनी सांगितलेलं की राज यांच्या कुठल्याही वक्तव्यावर कोणीही प्रतिक्रिया देऊ नये. याचा अर्थ फार खोल आहे,” असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा रद्द करण्याच्या वक्तव्यावरुन भाजपाचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचं दिसून येतं, असं भास्कर जाधव म्हणाले. भाजपाचं खरं रुप काय, त्यांनी काढलेली नखं राज ठाकरेंनी वेळीच ओळखली. म्हणून मी हे भाषण राजकीय प्रगल्भतेनं घेण्याची गरज आहे. गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असं म्हणतोय, असंही भास्कर जाधवांनी म्हटलं. भास्कर जाधव यांच्या या विधानाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.