आग्रा,दि.19: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. येथे तीन बुटांच्या व्यापाऱ्यांच्या जागेवर छापा टाकण्यात आला, ज्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. आतापर्यंत 40 कोटी रुपयांची रोकड सापडली असून, उर्वरित रोकड मोजली जात असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यादरम्यान बुटांच्या व्यावसायिकाच्या घरी नोटांचा ढीग सापडला, त्यात 500 रुपयांच्या नोटा होत्या. किती रोकड आहे याची मोजणी सुरू आहे. आयकर विभागाने नोटा मोजण्याची जबाबदारी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे.
आतापर्यंत 40 कोटींची मोजणी झाली आहे. ज्याचा हिशेब नाही. उर्वरित रक्कम मोजली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा मोजताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.
आयकर विभागाला त्याच्याकडे करचोरी आणि बेहिशोबी मालमत्ता असल्याचा संशय होता. विभागाला याबाबत माहिती मिळताच पथकाने तीन चपलांच्या व्यापाऱ्यांच्या आवारात छापा टाकला. मात्र, विभागीय अधिकारी अद्यापही याबाबत बोलण्याचे टाळत आहेत.
याआधी आयकर विभागाने उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती. येथील बंशीधर टोबॅको कंपनीवर विभागाने छापा टाकला होता. या कंपनीने कानपूरशिवाय मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्येही आपला व्यवसाय वाढवला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुमारे 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले.