हैद्राबाद, दि.23: तेलंगणाची (Telangana) राजधानी असलेल्या हैदराबादमध्ये (Haidrabad) एक मोठी दुर्घटना घडली आहे. भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागली असून या आगीत होरपळून 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाईगुडा परिसरातील एका भंगाराच्या गोदामात अचानक आग लागली. आगीत जळालेले सर्व मजूर हे बिहारचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आले आहे. हैदराबादच्या सेंट्रल झोनचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. डीसीपी यांनी 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार गोदामाच्या पहिल्या मजल्यावर 12 मजूर झोपले होते. त्यावेळी तळमजल्यावर अचानक आग लागली. मजुरांना बाहेर पडण्यासाठी रस्ता हा तळमजल्यावरूनच होता. मात्र शटर बंद असल्याने ते पटकन बाहेर पडू शकले नाहीत.
आगीत 11 मजूर जळाले
गोदामातील एक मजूर कसाबसा आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरला आहे. तो जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीतून आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. फायर कंट्रोल रुमला रात्री तीन वाजता याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या नऊ गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
तब्बल तीन तासांनी त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. गोदामामध्ये फायबरच्या केबलला आग लागली. ज्यामुळे आगीचे लोट आणि धुराचं साम्राज्य निर्माण झालं. थोड्यावेळाने ती आग आणखी वाढली. तसेच भंगाराच्या गोदामात बॉटल, कागद, प्लास्टिक असं इतरही सामान होतं. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे.