सोलापूर,दि.३१: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेत्यांनी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील अजित पवार गटाच्या ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत्या सुनेत्रा पवार आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी याची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज दुपारी २ वाजता बोलावण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात बैठकीचा प्रस्ताव होता, परंतु त्यापूर्वी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील याबाबत बैठक झाली. शरद पवार यांना भेटण्याअगोदरच उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार आज शरद पवारांना भेटणार होत्या पण त्याआधीच शपथविधी सोहळा कार्यक्रम ठरवण्यात आला. शरद पवार आणि सुनेत्रा पवार अर्थातच सासरे आणि सून यांच्यात दरी निर्माण करण्यासाठीच त्यांची भेट होऊ दिली नसल्याची चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच घाईघाईने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे अध्यक्षही सुनेत्रा पवार यांनाच करण्यात येणार आहे.
या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होईल. बैठकीत झालेला कोणताही निर्णय औपचारिकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला जाईल. वृत्तानुसार, सुनील तटकरे पक्ष कार्यालयात येणार आहेत.
दरम्यान, गोविंद बाग येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्यात बैठक सुरू झाली आहे. दरम्यान, पार्थ पवार देखील शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बाग येथे पोहोचले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील म्हणाले, ” गेल्या काही दिवसांत अजित पवार माझ्या घरी आले होते. आम्ही सुमारे १० किंवा त्याहून अधिक वेळा भेटलो. अजितदादांनी सांगितले की दोन्ही पक्षांनी फक्त शरद पवारांच्या उपस्थितीतच एकत्र यावे. अजित पवारांना पवार साहेबांबद्दल खूप आदर होता आणि सर्वांनी एकत्र राहावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती.”
१७ जानेवारी रोजी बारामती येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी असलेल्या गोविंद बाग येथे झालेल्या बैठकीत अजित पवार हे शरद पवारांसोबत उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीची पुष्टी करूनही, सुनील तटकरे बैठक संपेपर्यंत पोहोचले नाहीत.








