मुंबई,दि.२६: महाराष्ट्रात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला. बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्धव ठाकरेंनी गुरुवारी दौरा केला. या जिल्ह्यांमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंनी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.
ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी खासदार संजय राऊतही त्यांच्यासोबत होते. संजय राऊतांचा एक व्हिडीओ भारतीय जनता पार्टीने शेअर करत, “जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा” असा टोला लगावला आहे. ठाकरेंच्या दौऱ्यातील एक व्हिडीओ शेअर करत भाजपाने राऊत शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील नसल्याचा आरोप केलाय. ZEE 24 तासने याबाबत वृत्त दिलं आहे.
ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. धीर सोडू नका, शिवसेना सदैव तुमच्या सोबत आहे, शेतकऱ्यांना हक्काची मदत देण्यास सरकारला भाग पाडू, कर्जमुक्तीसाठीही पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. वाटेत जिथे जिथे शेतकरी उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला हात दाखवत होते तिथे उद्धव ठाकरेंनी ताफा थांबवून शेतकऱ्यांशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनी रस्त्यात ताफा थांबवून शेतकऱ्यांशी संवाद साधतानाचा आणि निवेदनं स्वीकारतानाचा व्हिडीओ भाजपाने पोस्ट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे कारबाहेर उभे राहून शेतकऱ्यांशी बोलताना राऊत कारमध्येच बसल्याचं भाजपाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे. “संजय राऊत तुम्हाला लाज वाटली पाहिजे!” अशा मथळ्याखाली भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंच्या धाराशीव दौऱ्यातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. “ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्धवजी ठाकरे गेले असताना जनाब संजय राऊत हे गाडीत बसून काजू बादाम खात होते,” असा आरोप बन यांनी केला आहे.








